नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तेजस्वी वारसा : चार पिढ्या प्रशासकीय सेवेत !

जळगाव-जितेंद्र कोतवाल (लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह फिचर ) | जळगावच्या जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिशय कुशाग्र बुध्दीमत्ता आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेल्या आयुष यांच्या कुटुंबातील चक्क चार पिढ्या या प्रशासकीय सेवेत असून यात त्यांचे पणजोबांपासून ते त्यांच्या पर्यंतच्या पर्यंतचा समावेश आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

आज सायंकाळी आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या जागी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावरून आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. आयुष प्रसाद हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून ख्यात आहेत. याच्या जोडीला त्यांचे कुटुंब हे प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांचे पणजोबा हे ब्रिटीश काळातील आयसीएस अर्थात ‘इंडियन सिव्हील सर्व्हीस’मधील सनदी अधिकारी होते. तर आयुष प्रदान यांचे आजोबा हे भारतीय प्रशासनीक सेवेतील (आयएएस) अधिकारी होते.

त्यांचे वडील ए. एम. प्रसाद हे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असून ते सध्या कर्नाटकात गुप्तचर खात्याचे सहायक पोलीस महासंचालक ( एडीजीपी ) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. अमिता प्रसाद या आयएएस अधिकारी असून सध्या केंद्रीय जलखात्यामध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्या मिशन गंगा या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत हे विशेष ! तर त्यांच्या लहान बहिणीने विधी शाखेतील पदवी संपादन केली आहे.

हे देखील वाचा : अमन मित्तल यांची बदली; आयुष प्रसाद नवीन जिल्हाधिकारी

आयुष प्रसाद यांचे शिक्षण वडिलांच्या बदल्यांमुळे तब्बल १२ वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. २०१० साली त्यांनी मणिपाल इन्स्टीट्युटमधून अभियांत्रीकीची पदवी संपादन केली. टिसीएसच्या इनोव्हेशन लॅबमध्ये त्यांनी काम करतांना मोबाईल वॅलेट विकसित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तर यंग इंडिया फेलोशीप मिळवून त्यांनी अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठात लिबरल आर्ट अँड लीडरशीप या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर ते स्टेट बॅकेत रूजू झाले. येथे त्यांनी डेप्युटी मॅनेजर म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील कल्याणकारी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. लक्षणीय बाब म्हणजे ते लेखक आणि स्तंभलेखक देखील आहेत. तर त्यांच्या पत्नी इंद्राणी मिश्रा या बालरोगतज्ज्ञ आहेत.

आयुष प्रसाद यांनी २०१४ साली युपीएससीची तयारी केली. यात त्यांना यश आले नाही. तथापि, दुसर्‍या प्रयत्नात पुढील सालीच ते थेट ऑल इंडिया २४ व्या क्रमांकाची रँक मिळवून भारतीय प्रशासनीक सेवा अर्थात आयएएस म्हणून रूजू झाले. आपल्या सेवेसाठी त्यांनी महाराष्ट्र कॅडरची निवड केली. प्रशिक्षणाचा काळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अकोला तर यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. यानंतर ते आता जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होत आहेत. जिल्हाधिकारीपदाची त्यांची ही पहिलीच पोस्टींग आहे.

आयुष प्रसाद हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्यात आहेत. पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये त्यांनी पारदर्शकपणा आणला. निधीचे अचूक नियोजन करण्याची कामगिरी त्यांनी केली. तर कोविड काळातील त्यांच्या सेवेचे देखील मोठे कौतुक झाले. आता ते जळगाव जिल्ह्याची धुरा सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने विकासवाटेवर गतीमान व्हावे हीच अपेक्षा.

Protected Content