मोठी बातमी : जळगाव जिल्हाधिकारी व जि.प. सीईओंची बदली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बदली झाली आहे. यात विहीत कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच मित्तल यांची बदली झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात अमन मित्तल आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अमन मित्तल यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. यानंतर त्यांच्या येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले नसतांनाच आज त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमन मित्तल यांचा कार्यकाळ हा अनेक वादग्रस्त घटनांनी गाजला होता. यात विशेष करून वाळू माफियांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या विरोधात अगदी उच्च पातळीपर्यंत तक्रारी केल्या होत्या. यात वाळूसह शस्त्र परवान्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश होता. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांची बदली झाल्याचे मानले जात आहे.

यामुळे तीन वर्षांच्या आधीच त्यांची उचलबांगडी झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या जागी सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेच.

दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. यामुळे ते देखील जळगावातून जात आहे. तर त्यांच्या जागा गडचिरोली येथील श्री अंकित या आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content