अजित पवार हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ! : जिल्हाभरात फलक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी जोरदार फलकबाजी केली असून यात युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी जिल्हाभरात लावलेले फलक हे लक्षवेधी ठरले आहेत.

( Image Credit Source : Live Trends News )

आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. अलीकडेच रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमिवर आपण यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. यामुळे त्यांनी केलेल्या घोषणेनुसार यंदा वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. असे असूनही ठिकठिकाणी शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून दादांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.

यात युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा अजितदादांचे कट्टर समर्थक रवींद्र नाना पाटील यांनी जळगावसह भुसावळ, मुक्ताईनगर आदीसह ठिकठिकाणी लावलेले फलक लक्षवेधी ठरले आहेत. यात त्यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार असे नमूद केले आहे. या माध्यमातून त्यांनी भावी काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळणार असल्याचा आशवाद व्यक्त केला आहे. त्यांचे हे फलक सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहेत. रवींद्र नाना पाटील यांनी विनोद देशमुख यांच्यासोबतीने जिल्ह्यातून पहिल्यांदाच अजितदादा पवार यांना पाठींबा दिला होता. यामुळे त्यांना शरद पवार यांच्या गटाने पक्षातून निलंबीत करण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, या संदर्भात रवींद्र नाना पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले की, आज अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असले तरी आगामी काळात त्यांच्याकडे नक्कीच मुख्यमंत्रीपदाची धुरा येणार असल्याचा आम्हाला ठाम विश्‍वास आहे. याचमुळे आम्ही आजच त्यांना मुख्यमंत्रीपदाची शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.

Protected Content