इंधनासह रासायनिक खतांची दरवाढ रद्द करा; मुक्ताईनगरात राष्ट्रवादीचे निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांसह पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. ही दरवाढ केंद्र शासनाचे त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन देवून निषेध व्यक्त केला आहे. दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी पं.स. सभापती राजेंद्र माळी, प्रदिप साळुंखे, माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, आसिफ बागवान, शिवराज पाटील, संजय कोळी, राजु कापसे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजु चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरवाढीच्या निषेधार्थ घोषणबाजी करण्यात आली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगामजवळ येऊन ठेपला आहे. पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु गेल्या वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, वकाळी पर्जन्य, वादळीमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरिप हंगामजवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणांच्या किंमती भाजपाच्या केंद्रशासनाने भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे.  

पूर्वी १ हजार १८५ ला मिळणारी डीएपीची गोणी आता १ हजार ९०० रुपयाला मिळणार आहे,  १०.२६.२६ च्या ५० किलो गोणीची किंमत १ हजार १७५ होती ती आता १ हजार ७७५ ला मिळणार आहे. अशा प्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने १५ ते १७ टक्के दरवाढ केली आहे. हि दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याचबरोबर आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते. केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ केली असल्या कारणाने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलची हि दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची आहे.

ही दरवाढ केंद्र शासनाने कमी करावी अशी मागणी करून दरवाढीचा निषेध व्यक्त केला आहे. दरवाढ रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content