जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत आयोजित ‘विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२६’ जळगाव येथे उत्साहात सुरू झाल्या आहेत. शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने १८ व १९ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, डेंटल, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि युनानी महाविद्यालयांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
या विभागीय निवड चाचणीमध्ये कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. वैद्यकीय व आरोग्यविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच उत्कृष्ट खेळाडूंची पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी निवड करणे, या दृष्टीने या स्पर्धांना महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे सत्र अधिष्ठाता डॉ. पराग भागवत, अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद पाटील आणि मुख्य समन्वयक डॉ. अर्चना काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहभागातून स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांतील विद्यार्थी कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स या खेळांमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी निवड चाचणीत चांगली कामगिरी करून यश संपादन करावे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.



