महामार्ग जीवघेणा : कारने तिघांना उडविले: एक ठार, दोन जखमी

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलास लागून असणार्‍या बॅरीकेडसवर बसलेल्या तिघांना भरधाव कारने उडविले असून यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, नशिराबाद येथे उड्डाणपूल कार्यान्वित झाला असल्याने महामार्गावरील वाहतुकीचा धोका कमी झाला आहे. मात्र पुलाच्या जळगावकडील भागापासून डावीकडे एक रस्ता हा सर्व्हीस रोडकडे वळतो तेथे अनेकदा अपघातांना धोका दिसून आला आहे. सुरक्षिततेसाठी कंत्राटदाराने दूरपर्यंत बॅरीकेडस उभारले आहेत. याच बॅरीकेडसवर रात्री आठच्या सुमारास तीन जण बसलेले होते.

दरम्यान, काल एम.एच. १९ ए.झेड २०२० या कारच्या चालकाचे स्वत:वरील नियंत्रण सुटल्याने त्याने या तिघांना उडविले. या अपघातात शेख जैनोद्दिन शेख अमिर मन्यार (वय ५२, रा. मन्यार मोहल्ला) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू होण्याआधी त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांच्या सोबत बसलेले शरीफखॉ सरवरखॉ,चांदखॉ रशिदखॉ (दोघे रा. ताजनगर, नशिराबाद) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कारचालक पंकज नारायण येवले (रा. भुसावळ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content