
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येत्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थिती आणि आपत्कालीन घटनांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जळगाव प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशानुसार मेहरूण तलाव परिसरात विशेष शोध व बचाव प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विविध विभागांच्या आपत्कालीन यंत्रणांची सज्जता तपासण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस दल, महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग तसेच महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता हे प्रात्यक्षिक पार पडले. मान्सून काळात पूर, बुडण्याच्या दुर्घटना किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी बचाव पथक कितपत सक्षम आहे, याचा सराव या माध्यमातून करण्यात आला.
या प्रात्यक्षिकात आधुनिक शोध व बचाव साहित्याचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. बोटीच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढणे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखणे आणि दुर्घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचविणे यासंदर्भात प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक बबन आव्हाड तसेच केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला. यावेळी अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, यश अहिरे, अजय पाटील, दीपक चौधरी, १०८ ॲम्बुलन्स चालक संदीप गवले, डॉ. मोईन शेख, महावितरणचे कार्यकारी अभियंता साळी साहेब, हर्षल नेते, फायरमन योगेश कोल्हे, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, जगदीश साळुंखे, किरण पाटील, राकेश सोनवणे, विकी सोनवणे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ८७ पोलीस चौक्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या आपत्कालीन बचाव साहित्य किटबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महावितरणच्या आपत्कालीन पथकाने विजेच्या तारांजवळील धोकादायक झाडांच्या फांद्या सुरक्षितपणे कशा कापल्या जातात, याचेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.



