
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राच्या कार्यकर्ता विकास वर्गानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पथसंचलनाने शहर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले. मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या या शिस्तबद्ध संचलनाचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले.

मूळजी जेठा (मू. जे.) महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग १० मेपासून सुरू असून, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतील स्वयंसेवक या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण उपक्रमाचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शहरातून भव्य पथसंचलन काढण्यात आले.
सायंकाळी ठिक सहा वाजता मू. जे. महाविद्यालय परिसरातून संचलनाला सुरुवात झाली. पूर्ण गणवेशात, हातात दंड घेत शिस्तबद्ध पावले टाकत चालणाऱ्या स्वयंसेवकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ‘घोष’च्या मधुर आणि उत्साहवर्धक तालावर निघालेल्या या संचलनामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पथसंचलन मू. जे. महाविद्यालयाच्या मागील भागातून सुरू होऊन गिरणा टाकी, काव्यरत्नावली चौक आणि ओंकारेश्वर मंदिर मार्गे पुढे गेले. त्यानंतर एकलव्य क्रीडांगणावर संचलनाचा समारोप करण्यात आला. संचलनाच्या संपूर्ण मार्गावर स्वयंसेवकांची शिस्त, एकसमान चाल आणि घोषवादन हे आकर्षणाचे केंद्र ठरले.
पथसंचलनाच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. मार्गावर आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. स्वयंसेवक संचलनातून जात असताना महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवकांनी घराबाहेर येत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. “भारत माता की जय” आणि संघघोषाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
नागरिकांनी मोठ्या उत्साहात केलेले स्वागत आणि स्वयंसेवकांनी दाखविलेली शिस्त यामुळे हे पथसंचलन शहरातील चर्चेचा विषय ठरले. अनेकांनी मोबाईलद्वारे या सोहळ्याचे चित्रीकरण करत या क्षणांचा आनंद घेतला.



