Home Cities जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : स्पर्धा परीक्षांच्या तरुणांसाठी ठरले ‘देवदूत’

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : स्पर्धा परीक्षांच्या तरुणांसाठी ठरले ‘देवदूत’

0
17

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत करणाऱ्या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले आहेत. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी जागेवरच सोडवल्या नाहीत, तर स्वतः पदरमोड करत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचीही सोय करून दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे ग्रामीण भागातील होतकरू तरुणांच्या स्वप्नांना नवी उमेद आणि भरारी मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रोहन घुगे हे प्रशासकीय कामानिमित्त सकाळी पारोळा तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान रस्त्यावर स्पर्धा परीक्षांचा सराव करणारे अनेक तरुण त्यांना धावताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून या तरुणांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या थेट संवादादरम्यान, स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना सरावासाठी योग्य मैदान आणि सामूहिक अभ्यासिका नसणे, तसेच गावातून शाळेत व अभ्यासासाठी जाण्या-येण्यासाठी हक्काच्या एसटी बसेस उपलब्ध नसणे, अशा अनेक बिकट समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तरुणांच्या व्यथा आणि वास्तव परिस्थिती ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता तातडीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले आणि विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी जागेवरच मार्गी लावल्या. यानंतर अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या महागड्या पुस्तकांची अडचण समोर आल्यावर, त्यांनी कोणतीही औपचारिकता न बाळगता स्वखर्चाने पुस्तके उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर केला.


Protected Content

Play sound