Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा’ अभियान सुरू

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा’ अभियान सुरू

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अभियानांतर्गत आता ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे २६ ऑक्टोबर ते ४ डिसेंबरदरम्यान चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता चोपडा तालुक्यातील नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या अभियानाचा शुभारंभ २६ ऑक्टोबर रोजी धानोरा, मोहरद आणि बीडगाव येथे करण्यात आला. पहिल्याच दिवशी तिन्ही गावांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शेकडो नागरिकांची नेत्रतपासणी केली. या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांच्यासह डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे हे डॉक्टर या अभियानात रुग्णसेवा देणार आहेत.

चोपडा तालुक्यातील नेत्रतपासणी शिबिरांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी अडावद, सुटकर आणि खुर्डी; ३० ऑक्टोबर रोजी वड्री, मंगरूळ आणि वडली; २ नोव्हेंबर रोजी विष्णापूर, अडगाव आणि विरवाडे; ४ नोव्हेंबर रोजी नागलवाडी, वराड आणि गणापूर येथे शिबिरे होणार आहेत.

त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी चांदसणी, कमलगाव आणि पंचक; १६ नोव्हेंबर रोजी वैजापूर, देन्हारी आणि उमर्टी; १८ नोव्हेंबर रोजी सत्रासेन, लासूर आणि चौगाव; २० नोव्हेंबर रोजी अकुलखेडा, चहार्डी आणि हातेड; २३ नोव्हेंबर रोजी बुधगाव, अनवर्दे आणि वाळसी; २७ नोव्हेंबर रोजी कुसुंबा, वेळोदे आणि वनेदा; तर ३० नोव्हेंबर रोजी खाचणे, कुरवेल आणि तावसे येथे नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. २ डिसेंबर रोजी निमगाव, वेले आणि गरनाड, तर ४ डिसेंबर रोजी कलोदा, कठोरा आणि वटार येथे शिबिरे आयोजित करून अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.

रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत हजारो नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन चोपडा तालुकाही मोतीबिंदूमुक्त करण्याचा मानस असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितू पाटील यांनी सांगितले.

“तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही दृष्टी गमवावी लागू नये आणि मोतीबिंदूमुळे कोणाचेही जीवन अंधारमय होऊ नये, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन नेत्रतपासणी करून घ्यावी आणि गरजू रुग्णांना या उपक्रमाचा लाभ मिळवून द्यावा,” असे आवाहन डॉ. नितू पाटील यांनी केले.

चोपडा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात सहभागी होऊन नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. या अभियानामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना नेत्रतपासणीची सुविधा गावातच उपलब्ध होणार असून, वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound