पाचोरा – जामनेर रेल्वे बंद झाल्यास माझे अपयश – खा. उन्मेष पाटील

पाचोरा, नंदू शेलकर | “पाचोरा – जामनेर रेल्वे या रेल्वे मार्गाचे नॅरो गेजमधून ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करुन बोदवडपर्यंत नेण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून पी. जे. रेल्वे बंद झाल्यास ते खासदार म्हणून माझे अपयश असेल” असे खा. उन्मेष पाटील यांनी पाचोरा येथे पी. जे. रेल्वे बचाव समितीच्या बैठकीत सांगितले.

पाचोरा – जामनेर रेल्वे ही गोर – गरिब,शाळकरी विद्यार्थी यांची लाईफलाईन असून या रेल्वेशी सर्वसामान्य जनतेच्या भावना जुळल्या आहेत. पी. जे. रेल्वे कोरोनामुळे बंद करण्यात आली असून ती कायमची बंद होणार असल्याचा अनेकांचा विविध कारणांमुळे गैरसमज झालेला आहे. या अधिवेशनात या रेल्वे मार्गाचा नॅरो गेजमधून ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करुन बोदवडपर्यंत नेण्याच्या प्रस्थावास मंजुरी मिळाली असून या कामाची निविदा सप्टेंबर – २०२२ पर्यंत निघून कामास सुरुवात केली जाणार आहे.

या कामासाठी ८२७ कोटी रुपये मंजूर झाले असून पी. जे. रेल्वे बंद झाल्यास ते खासदार म्हणून माझे अपयश असेल अशी माहिती खा. उन्मेष पाटील यांनी सायंकाळी झालेल्या बैठकीत देवून पी. जे. रेल्वे बंद झाल्यास ती पूर्ववत सुरू करण्यासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून मी आपल्या सोबत आंदोलनात सहभागी होईल. जानेवारी महिन्याच्या पुढील आठवड्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेसोबत पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना सोबत घेऊन समितीसह आपल्या भावना मांडून संपूर्ण माहिती प्राप्त करुन देवू असेही आश्वासन खा. पाटील यांनी दिले.

यावेळी भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील यांनी ‘पी. जे. रेल्वे सुरु करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी लागणार असल्याचे सांगितले असता’ यावर आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या ज्या ही अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. पी. जे. रेल्वेशी सर्व सामान्य जनतेच्या भावना जुळलेल्या असल्याने नागरिकांना विश्वास बसण्यासाठी खा. उन्मेष पाटील यांनी रेल्वे बंद होणार नसल्याबाबतचे किमान डी. आर. एम. चे लेखी पत्र मिळवून द्यावे.”

कार्यक्रमात भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, खलील देशमुख, अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, अॅड.आण्णा भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, गणेश पाटील, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, दिपक आदिवाल, किशोर डोंगरे, गोविंद शेलार, रोटरीचे निलेश कोटेचा, मुख्य बुकींग पर्यवेक्षक ए. एच. मिर्झा उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांनी खासदार उन्मेश पाटील यांना केले होते आवाहन –

“पाचोरा ते जामनेर पी. जे. रेल्वे ही पाचोरा – जामनेर तालुक्यातील गोरं गरिब व चाकरमान्यांची जीवनवाहिनी असल्याने ती त्वरित सुरू करावी अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारेल” असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी सोमवार, दि. २० डिसेंबर रोजी खासदार उन्मेश पाटील यांना दिले होते.

याप्रसंगी बैठकीस विलास जोशी, अॅड. आण्णा भोईटे, पप्पु राजपूत, प्रविण ब्राम्हणे, प्रभारी स्टेशन मास्टर एस. बी. पाटील, उप अधिक्षक पंकज कुमार, मुख्य वाणिज्य निरिक्षक चंद्रकांत कवडे, सुनिल पाटील, मतीन बागवान, म.न.से. चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी (शेंदुर्णी), वरखेडी येथील ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील, राजेश पाटील, सिद्धांत पाटील, नाना खोंडे, सुधीर शर्मा, रमेश पवार, समाधान मुळे, भैय्या ठाकूर, प्रशांत सोनवणे, ऋषीकेश पाटील, चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किसन राख, ईश्वर बोरुडे, मधुसूदन भावसार, संदिप जावळे, विलास पाटील, पाचोरा आर. पी. एफ. चे बी. पी. द्विवेदी, ए. के. तडवी, बी. बी. सुरवाडे, एल. बी. शाहु उपस्थित होते.

पाचोरा – जामनेर रेल्वेचे मीटर गेज वरुन पाचोरा ते बोदवड पर्यंत ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करण्यासाठी माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दि. २३ मार्च २०१९ रोजी झालेल्या अर्थ संकल्पात रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे यांनी मागणी केल्यानंतर ८५० कोटी रुपये मंजुर केले होते. दरम्यान सन – २००५ मध्ये पाचोरा ते बोदवड पर्यंत ब्रॉड गेज करण्याची मागणी केली होती. तर यापूर्वी सन – २००१ मध्ये माजी खासदार वाय. जी. महाजन यांनीही पाठपुरावा केला होता. पी. जे. ही ब्रिटीशकालीन रेल्वे असल्याने पाचोरा रेल्वे स्टेशन हे जंक्शन स्टेशन झाले आहे. पी. जे. रेल्वे बंद झाल्यास पाचोरा हे जंक्शन रेल्वे स्थानक राहणार नाही. महाराष्ट्राच्या पहिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देशाच्या राष्ट्रपती असतांना पी. जे. रेल्वेचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करुन ती गाडी बोदवडपर्यंत नेण्याची मागणी केली होती.

पी. जे. रेल्वे बचाव कृती समितीने दिले खासदारांना निवेदन

पी. जे. बचाव कृती समितीच्या सदस्यांनी खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात येथील डिझेल पंप बंद करणे, पाचोरा ते जामनेर दरम्यान येत असलेल्या सर्व रेल्वे स्टेशनवरील स्टाफ (कर्मचारी) भुसावळ येथे वर्ग करणे, यासारख्या निर्णयावरून रेल्वे मंडळाने पी. जे. रेल्वे कायमची बंद करण्याचा निर्णय घेतल्याची संशयास्पद चिन्हे दिसत असल्याने असे होत असल्यास कृती समिती भविष्यात मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले

Protected Content