मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानक परिसरात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली असून यामुळे प्रवाशांसोबतच कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत.
मुक्ताईनगर बस स्थानकामध्ये गेले कित्येक दिवसापासून स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात बस उभे राहत असलेल्या ठिकाणी देखील नियमीत साफसफाई होत नसल्याने प्रवाशांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा डेपो मॅनेजर यांना सुद्धा येथील व्यवस्था सुधार होत नाही. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे.
दरम्यान, बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची अतिशय दैनावस्था झालेली आहे. यात महिला आणि पुरूष या दोघांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रसाधनगृह आणि शौचालयात अतिशय घाण असल्यामुळे कुणालाही तेथे जातांना अनेकदा विचार करावा लागतो. बसस्थानक परिसरातील पथदिवे देखील अनेकदा बंद राहतात. यामुळे महिला आणि विद्यार्थीनी यांना येथे असुरक्षित वाटते. या बाबींची अनेकदा तक्रारी करून देखील काहीही कार्यवाही होत नसल्याने प्रवासी त्रस्त झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस येथे दारूडे आणि अवैध धंदेवाले येत असल्याने महिलांना जीव मुठीत धरून उभे रहावे लागते. तर रात्रीच्या वेळेस अनेकदा बर्याच बसेस बायपास वरून निघून जात असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढीस लागली आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामुळे कर्मचारी देखील त्रस्त झाले असले तरी ते वरिष्ठांसमोर काहीही बोलू शकत नसून त्यांचीही मोठी कुचंबणा होत आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराची दखल घेऊन परिसरात स्वच्छता राखण्यात यावी अशी मागणी प्रवासी आणि कर्मचार्यांकडून होत आहे.