शब्द न पाळल्याने सरपंच पायउतार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पदाच्या कालावधीबाबत दिलेला शब्द न पाळल्याने तालुक्यातील नायगाव येथील सरपंचांवर अविश्‍वास प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

नायगाव ग्राम पंचायतच्या कार्यालयात गुरुवारी दिनांक ९ मार्च रोजी यावलचे तहसीलदार महेश पवार यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यात सरपंच शरीफा तडवी यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारीत करण्यात आला होता. याआधी उपसरपंच सह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तेव्हा या अविश्वास प्रस्तावावर गुरुवारी नायगाव ग्राम पंचायत मध्ये तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

या सभेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १३ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले व अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. या सभेत उपसरपंच सोनल रामदास पाटील, ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र पाटील, चेतन पाटील, अजय पाटील, उत्तमराव सपकाळे, महेंद्र तडवी, नूरजहान तडवी, वृषाली पाटील, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, आलिशान तडवी, राजू तडवी व शरीफा तडवी यांची उपस्थिती होती. सभेचे कामकाजात ग्रामसेवक विलास साळुंखे यांनी सहकार्य केले.

ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते व पाच वर्षात तिघांना सरपंच पद विभागून देण्याचे ठरले होते. मात्र दोन वर्ष होऊन देखील सरपंच शरीफा तडवी यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यातून अविश्‍वास प्रस्ताव पारीत करण्यात आला. दरम्यान, नायगाव ग्रामपंचायतीच्या उर्वरित पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी आलिशान तडवी व नूरजहान तडवी यांना विभागून सरपंच पद दिले जाणार आहे.

Protected Content