ब्रेकींग : ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तालुक्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता असून मनोहर पाटील हे समर्थकांसह राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. तर आज मुंबईत मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

डॉ. मनोहर पाटील हे जिल्ह्यातील सर्वात जुन्या-जाणत्या शिवसैनिकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पक्षाचे कट्टर निष्ठावंत ही त्यांची ओळख आहे. यामुळे मध्यंतरी पक्षात उभी फूट पडली असतांनाही त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा पर्याय निवडला. या पार्श्‍वभूमिवर, ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या वृत्ताला त्यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे पदाधिकारी विश्‍वजीत राजे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

डॉ. मनोहर पाटील यांनी १९९० साली शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. १९९५च्या निवडणुकीत जामनेरची जागा शिवसेनेकडून भाजपने घेतली. याच्या बदल्यात भुसावळची भाजपची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे डॉ. मनोहर पाटील यांची संधी कायमची हुकली. असे असले तरी कितीही अडचणी आल्या तरी ते पक्षाशी एकनिष्ठ होते. यातच आता ते पक्षांतर करणार असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची बाब निश्‍चीत आहे.

Protected Content