शासकीय रुग्णालयाचे नवीन अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे; उपअधीक्षकपदी डॉ. गावित, डॉ. मालकर

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. प्रशांत रत्नाकर देवरे यांची नियुक्ती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केली आहे. यासह दोन उप वैद्यकीय अधीक्षक व दोन विशेष कार्याधिकारी यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. 

रुग्णालय कामकाजात अधिक सुटसुटीतपणा यावा, सूत्रबद्ध व नियोजनात्मक कामकाज निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी काही बदल केले आहेत. याकरिता शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात आले असून डॉ. देवरे यांच्यासह नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतला आहे. तसेच, कामकाजाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. 

डॉ. देवरे यापूर्वी धुळे येथे कार्यरत होते. त्यांनी अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. तसेच शल्यचिकित्साशास्त्र विभाग, जळगाव येथे ते गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासह शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता गावित व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास मालकर यांची उप वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली आहे. 

डॉ. गावित ह्या देखील शल्यचिकित्साशास्त्र विभागात गेल्या ३ वर्षांपासून कार्यरत असून त्यांनीही अनेक रुग्णांना शस्त्रक्रियाद्वारा त्यांना दिलासा दिला आहे. तसेच डॉ. मालकर यांनी विद्यार्थ्यांना जनऔषध वैद्यक शास्त्र विषयात अध्यापन केलेले आहे. तसेच विशेष कार्याधिकारी म्हणून दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण व डॉ. सतीश सुरळकर यांची देखील नियुक्ती अधिष्ठाता यांनी केली आहे. रुग्णालयाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याकरिता रुग्णालयात हे बदल करण्यात आले आहेत.

 

Protected Content