भुसावळातील गुन्हेगारीसोबत नाकर्त्यांनाही हद्दपार करा : ना. गुलाबराव पाटील

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळातील गुन्हेगारी ही पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने आता थोडी कमी झालेली आहे. ज्या प्रकारे गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येते, अगदी त्याच प्रमाणे नाकर्त्या लोकप्रतिनिधींनाही जनता हद्दपार केल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून प्रदान करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर बोलतांना ना. पाटील यांनी आपण विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण अथवा भेदभाव करत नसून भुसावळच्या विकासासाठी आपण भरीव निधी प्रदान केल्याचे आवर्जून नमूद केले. शहरातील विविध कामांसाठी तब्बल ५८ कोटी रूपये मिळाले असून लवकरच भुसावळसः जिल्ह्याला सीसीटिव्हींसाठी ११ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याची घोषणा देखील पाकलमंत्र्यांनी केली.

आज भुसावळ शहरातील विविध विकासकामांचे भूमीपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रांताधिकारी तथा न. पा.प्रशासक रामसिंग सुलाणे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगराध्यक्ष रमण भोळे व सर्व पक्षीय माजी नगरसेवक  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कामांचे झाले भूमीपुजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज एकूण ६ कोटी २२ लाख रूपयांच्या कामांचे भूमीपुजन झाले. यात पालिकेच्या माध्यमातून म्युनिसिपल हॉस्पिटल ते मान रेसिडन्सीपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण, पालिका शाळेचे नूतनीकरण, रस्ता दुभाजक व सौंदर्यीकरण यांच्यासह  भुसावळातील म्युनिसिपल हॉस्पिटल ते लोखंडी पुलापर्यंत, बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी नाल्यापर्यंत आरसीसी रोड व गटारी, नाहाटा चौफुली, श्रीराम डेअरी पासून ते मोटुमल शोभराज चौकापर्यंत रस्त्यावर नवीन दुभाजक व सुशोभीकरण, यावल रोडवरील गांधी पुतळा ते जॉली पेट्रोल पंपापर्यंत सुशोभीकरण, गांधी पुतळा ते राहुल नगरपर्यंत दुभाजक तयार करणे, प्रभाग क्रमांक १९ मध्ये केळकर हॉस्पिटलमागील ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, प्रभाग ७ मधील तुषार चिरमाडे यांच्या घरापासून बाळू शिरोळे, अष्टविनायक कॉलनीत रस्ता कॉंक्रिटीकरण, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पालिका संचालित डी.एस.हायस्कूलचे नूतनीकरण, सर्वे क्रमांक ५३/४ अ मधील खुल्या जागेत उद्यान विकसीत करणे, पालिका संचालित शाळा क्रमांक १ चे नूतनीकरण व कंपाउंड वॉल आदी कामांचा समावेश होता.

गुलाबभाऊ हे खर्‍या अर्थाने पालकमंत्री : आ. संजय सावकारे

आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणातून भुसावळ शहरातील कामे हव्या त्या गतीने न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या २०-१५ वर्षात शहरात काहीच बदल झालेला नाही. अलीकडच्या काळात ना. गुलाबराव पाटील यांनी शहराला भरीव निधी दिल्यामुळे आता विकासकामे होऊ लागली आहेत. प्रशासक राजवटीत कामांना गती यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर ना. गुलाबराव पाटील हे कोणताही पक्षीय व राजकीय भेद बाळगत नसून सदैव विकासाच्या पाठीशी उभे राहतात. यामुळे ते खर्‍या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे गौरवोदगार आमदार सावकारे यांनी काढले.

पालकमंत्र्यांची टोलेबाजी

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी आपल्या भाषणातून भुसावळच्या विकासकामांसाठी आपण भरीव निधी मदत प्रदान केल्याची सांगितले. ते म्हणाले की, भुसावळशी आमचे जुने नाते आहे. या शहराच्या विकासाला गती यावी अशी आपली मन:पूर्वक इच्छा आहे. यासाठी आपण अलीकडेच शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तब्बल ५८ कोटी रूपयांचा निधी दिलेला असून भविष्यात देखील निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. भुसावळ शहरातील गुंडगिरी ही कायम चर्चेत असते. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शहरातील गुन्हेगारीवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळविलेले आहे. याचसाठी आता जळगांव व भुसावळ शहरासह जिल्ह्यात ११ कोटी रूपयातून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. तर अमृत योजनेच्या कामातील अडसर दूर होण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले.

शिवसैनिकांचा उत्साह शिगेला

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आजच्या दौर्‍यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले. पालकमंत्र्यांचे नाहाटा कॉलेज चौफुलीवर जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रचंड आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पालकमंत्र्यांच्या ताफ्याच्या आधी शिवसैनिकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. याप्रसंगी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी जिल्हा प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख बबलू बरहाटे, निलेश महाजन, ऍड निर्मल उर्फ चिकू दायमा, माजी नगरसेवक दिपक धांडे, पिंटू ठाकूर , प्रा. धीरज पाटील, नरेंद्र  लोखंडे,  पिंटू भोई , अमोल पाटील , संदीप पाटील , भीमराव कोळी आदी उपस्थित आहे

पिंटू कोठारी यांच्या प्रकृतीची विचारपूस

नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर, डॉ. निलेश महाजन यांनी कोरोना काळात केलेल्या सेवांबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांच्या हॉस्पीटलला भेट देऊन त्यांचे  कौतुक केले.

पालकमंत्र्यांचे क्रिकेट प्रेम

ना. गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरू असलेल्या स्व. निखील खडसे स्मृती चषक स्पर्धेला देखील भेट दिली. याप्रसंगी प्रा. सुनील नेवे आणि अनिकेत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपल्या आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत राजकारण्यांसाठी क्रिकेट हा खेळ किती महत्वाचा आहे हे आपल्या अनोख्या शैलीत कथन केले. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला ……हे गीत म्हणून त्यांनी क्रिकेट व जीवनातील साम्य विशद केले. तर क्रिकेटच्या मैदानावर माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी टाकलेला चेंडू त्यांनी टोलविल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा प्रश्‍न समजून घेणार

पालकमंत्र्यांच्या दौर्‍यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ  पुतळ्या बाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच त्यांच्या हस्ते नियोजीत पुतळ्याच्या फलकाला माल्यार्पण देखील करण्यात आले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी केले.

 

 

 

 

Protected Content