मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारात महत्वाची भूमिका पार पाडणार्या गावातील सरपंचांना कोविड योध्द्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय योजनांना लाभ मिळावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की,ग्रामीण भागातील कोविड योद्धा असलेल्या तमाम सरपंचाना फ्रंटलाईन वर्कर घोषित करून त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. तसेच शासनाच्या फ्रंट लाईन वर्करसाठी असलेल्या शासकीय सुविधांचा लाभ देण्यात याव्यात.
राज्यात कोरोनाने थैमान घातल्यापासून ते आजतागायत कोरोना संसर्ग महामारीत जिवाचे रान करून कोरोना संकट काळामध्ये जनजागृती करणे, नागरिकांना चाचणी करण्यास प्रवृत्त करणे, कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरला दाखल करणे आदी संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासत अहोरात्र काम करणारा कोरोना योद्धा म्हणून सरपंच अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत.
या कोविड योद्ध्यांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने ग्रामीण भागातील योद्धा असलेल्या तमाम सरपंचांना, फ्रंट लाईनवरील वर्कर घोषित करून सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. तसेच शासनाच्या फ्रंटलाईन वर्करसाठी असलेल्या इतर शासकीय सुविधांचा लाभ देण्यात याव्या अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रात केली आहे.