महाविकास आघाडीत बिघाडी : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये संघर्ष !

भुसावळ, दत्तात्रय गुरव | एकीकडे राज्यातील महाविकास आघाडीचा किल्ला अभेद्य असल्याची ग्वाही वरिष्ठ नेते देत असतांना जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे. बोदवड येथील नगरपंचायतीचे मतदान सुरू असतांना कार्यकर्ते नव्हे तर थेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये टक्कर झाली. यानंतर आज रवींद्रभैय्या पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना भेटून याबाबत निवेदन दिले. या निवेदनात अवैध धंद्यांवर नियंत्रणाची भाषा असली तरी रोख हा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई यांच्या गैरवर्तनाकडे असल्याने आता जिल्ह्यातील महाविकास आघाडीत विसंवाद सुरू झाला असून याची नांदी मुक्ताईनगर-बोदवडमध्ये झडल्याचे स्पष्ट झाले आहे. पहा या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे स्पेशल राजकीय विश्‍लेषण.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मतदारसंघात तीन दशकांपासून एकनाथराव खडसे यांच्याशी संघर्ष करणारे रवींद्रभैय्या पाटील यांना तिकिट मिळणार हे स्पष्ट होते. तथापि, महायुतीला नाकारत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात शड्डू ठोकल्यानंतर शरद पवार यांनी अतिशय मुरब्बीपणे रवींद्रभैय्यांना थांबण्याचे निर्देश देत चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत केले. आपले तिकिट कापले गेले म्हणून नाराज न होता रवींद्रभैय्यांनी आपली संपूर्ण ताकद चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी उभी केली. याचमुळे रोहिणी खडसे यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराचा निसटता पराभव करून ते विजयी झाले.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी एकनाथराव खडसे यांच्यासारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याने राष्ट्रवादी प्रवेश घेतला तेव्हा देखील रवींद्र भैय्या यांनी सलोख्याची आणि मोठेपणाची भूमिका घेतली. पक्षनेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून कोणतीही कटूता न दाखविता रवींद्रभैय्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन पुढे चालत राहिले. एकीकडे मुक्ताईनगर-बोदवडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असतांना रवींद्रभैय्या हे पक्ष नेतृत्वाचा आदेश मान्य करून खडसेंच्या मागे उभे राहिले. यातूनच बोदवड येथील निवडणुकीच्या कालखंडात त्यांच्याशी थेट शिवसेनेचे पदाधिकारीच भिडले.

काल बोदवड नगरपंचायतीसाठी मतदान झाले. येथे वरकरणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत असली तरी प्रमुख लढत ही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी व पर्यायाने आमदार चंद्रकांत पाटील विरूध्द एकनाथराव खडसे अशीच होती. दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत पणास लावली. निवडणुकीच्या प्रचारातही नेत्यांनी एकमेकांची उणी-दुणी काढली. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यातील शाब्दीक वाद चांगलेच रंगले. तर मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याच्या आरोपाबाबत पाहणी करण्यासाठी रवींद्रभैय्या पाटील हे गेले असतांना त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई यांनी हमरातुमरी केली. याप्रसंगी या दोघांनी रोहिणी खडसे यांच्या सोबतही वाद घातल्याने वातावरण तापले. सुदैवाने कालचे मतदान सुखरूपपणे पार पडले तरी आता या प्रकरणाला आज खर्‍या अर्थाने फोडणी मिळाली.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी आपल्या सहकारी पदाधिकार्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जिल्ह्यात सुरू असलेले नंबर दोनचे धंदे बंद करण्याचे निवेदन दिले. यातच रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी धक्काबुक्की करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तर पत्रकारांशी बोलतांना रवींद्रभैय्यांनी थेट समाधान महाजन आणि छोटू भोई यांचे नाव घेऊन त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने समाधान महाजन यांच्याशी संपर्क साधला असते ते आपली भूमिका उद्या जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र रवींद्रभैय्या यांच्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे त्यांनी नमूद केले आहे.

जळगाव जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील सत्तासंघर्ष हा कधीही उफाळून येऊ शकतो. आगामी नगरपालिका निवडणुकीत याची चुणूक दिसून येणार आहे. विशेष करून मुक्ताईनगर, सावदा, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, धरणगाव, चाळीसगाव आदी नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी होणे जवळपास अशक्य असल्याचे आजच दिसून येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संघर्ष अटळ असल्याचे दिसून येत आहे. राज्य पातळीवर महाविकास आघाडी मजबूत असल्याचे चित्र असले तरी मात्र जिल्ह्यात आघाडीची बिघाडी झाल्याचे आजच दिसून येत आहे. आगामी काळात हा संघर्ष अजून तीव्र रूप धारण करणार असल्याचे संकेत देखील आजच मिळालेले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यातील संघर्षात याचे बिजारोपण झाल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!