Home Cities अमळनेर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या, पुढील निवडणुका सोप्या होतील; आ. अनिल पाटील

मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या, पुढील निवडणुका सोप्या होतील; आ. अनिल पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुढील सर्व निवडणुका सक्षम आणि सोप्या करायच्या असतील तर विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण मोहीम (SIR) गांभीर्याने घ्या, या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या पुढील २० ते २५ वर्षांच्या राजकीय भवितव्याचा पाया ठरणार आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना बूथ पातळीवरील संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्यास शहर आणि ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना आ. अनिल पाटील यांनी मतदार यादीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.

निवडणूक आयोगाकडून काही वर्षांच्या अंतराने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. यामध्ये नवमतदारांची नोंद, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता, वय, फोटोतील चुका दुरुस्त करणे अशा प्रक्रिया केल्या जातात. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन पडताळणी करतात. ही केवळ प्रक्रिया नसून मतदारयादीची ‘विशेष साफसफाई आणि अपडेट मोहीम’ असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

“माझं बूथ प्लस म्हणजे माझा आणि पक्षाचा विजय,” असे सांगत बूथ पातळीवरील यशस्वी कार्यकर्त्यांचीच पक्षात दखल घेतली जाते, असेही त्यांनी नमूद केले. बूथवरील मतदान हे राजकारणातील थर्मामीटर असून मतदार यादी हे राजकीय भवितव्याचे आत्मा आहे, असे सांगत बूथ कार्यकर्त्यांनी मतदार यादी सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालिकेच्या निवडणुकीतील अपयशातून धडा घेत चुका सुधारण्याची संधी सध्या उपलब्ध असल्याचे सांगत SIR मोहिमेला संधी म्हणून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदार यादीचे अवलोकन करून आपल्या भागातील BLO सोबत समन्वय वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. येणाऱ्या काळात मॅपिंगद्वारे दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया वेगाने होणार असून मतदारसंघातील जवळपास ३२ हजार नावे कमी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बूथ रचना पक्की करण्यावर त्यांनी भर दिला.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून येत्या काळात बूथ कार्यकर्त्यांना थेट एंट्रीचे धोरण अवलंबले जाणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या मेळाव्यात माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा प्रवक्ते योगेश देसले आणि तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मंचावर माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नूतन शहराध्यक्ष चेतन राजपूत, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, जितुभाऊ ठाकूर, महिला अध्यक्षा मंदाकिनी भामरे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी, युवक ग्रामीण अध्यक्ष तारकेश्वर गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले तर आभार सुनील काटे यांनी मानले.

या मेळाव्यास बाजार समितीचे आजी-माजी संचालक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, सोसायटी चेअरमन, बूथ प्रमुख, शाखाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध फ्रंटल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मेळाव्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथस्तरावर संघटन बळकट करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.


Protected Content

Play sound