Home क्रीडा केएल राहुलचा विक्रमी स्फोट ; 152 धावांची ऐतिहासिक खेळी 

केएल राहुलचा विक्रमी स्फोट ; 152 धावांची ऐतिहासिक खेळी 


दिल्ली-वृत्तसेवा । दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अविश्वसनीय फलंदाजी करत 152 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि आयपीएल इतिहासात नवा अध्याय लिहिला. 9 षटकार आणि 16 चौकारांच्या जोरावर त्याने मैदानात अक्षरशः धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मिळालेल्या दोन जीवदानांचा पूर्ण फायदा घेत राहुलने ही ऐतिहासिक कामगिरी केली, ज्यामुळे पंजाबची एक चूक त्यांना महागात पडली.

सामन्याच्या सुरुवातीलाच राहुल केवळ 12 धावांवर असताना बाद होण्याच्या उंबरठ्यावर होता. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर पुल शॉट खेळताना त्याने चेंडू थेट स्क्वेअर लेगवरील क्षेत्ररक्षकाकडे मारला, मात्र सोपा झेल सोडल्याने राहुलला जीवनदान मिळाले. त्यानंतर 51 धावांवर असताना आणखी एक झेल सोडण्यात आला. या दोन मोठ्या चुका पंजाबला महागात पडल्या आणि राहुलने त्याचा फायदा घेत शतक पूर्ण केले.

या खेळीसह राहुल आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम 141 धावांसह अभिषेक शर्माच्या नावावर होता. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल (175) आणि ब्रेंडन मॅककुलम (158) यांचा क्रमांक लागतो. टी-20 क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

राहुलच्या या शतकासह त्याने आयपीएलमधील शतकांच्या यादीतही मोठी झेप घेतली आहे. हे त्याचे सहावे शतक ठरले असून त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता दोघेही संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत. राहुलच्या पुढे विराट कोहली (8 शतकं) आणि जोस बटलर (7 शतकं) हेच दोन खेळाडू आहेत.

या सामन्यात राहुलने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. 13 धावा करताच त्याने आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सहाव्या स्थानावर झेप घेत एमएस धोनी यांचा 5439 धावांचा टप्पा मागे टाकला. आता राहुलच्या पुढे केवळ पाच दिग्गज फलंदाज उरले आहेत.

दरम्यान, आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम अद्याप विराट कोहली यांच्या नावावर कायम आहे. त्यांनी 8989 धावा केल्या असून 9000 धावांच्या टप्प्यापासून ते अगदी जवळ आहेत. दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा असून त्यांच्या नावावर 7183 धावा आहेत. या दोघांमध्ये जवळपास 2000 धावांचे अंतर आहे.


Protected Content

Play sound