Home Cities भडगाव भडगाव-पाचोरा अतिवृष्टीग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज द्या; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अमोल शिंदे...

भडगाव-पाचोरा अतिवृष्टीग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज द्या; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अमोल शिंदे यांची मागणी

0
16

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव आणि पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, दुकाने आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या दोन्ही तालुक्यांतील बाधित शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी भाजप नेते अमोल शिंदे यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अलीकडील मुसळधार पावसामुळे भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील अनेक नदी-नाले व ओढ्यांना पूर आला. त्यामुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदी व नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले, तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

याशिवाय भडगाव आणि पाचोरा शहरातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही तालुक्यांतील जनजीवनावर गंभीर परिणाम झाल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

या संपूर्ण परिस्थितीत शेतकरी आणि बाधित कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाईचे वितरण करावे, अशी मागणीही अमोल शिंदे यांनी केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळाल्यास त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मोठा आधार मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

अमोल शिंदे यांनी राज्य शासनाने भडगाव व पाचोरा तालुक्यांसाठी स्वतंत्र विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करून शेतकरी, व्यापारी आणि पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. या निवेदनावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर होणार का, याकडे आता बाधित शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. तातडीची मदत आणि जलद नुकसानभरपाई मिळाल्यास पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound