
धुळे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची घंटा ठरलेली मंकी पॉक्सची साथ अखेर महाराष्ट्रातही शिरकाव करत आहे. धुळे जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर गेले आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा धुळ्यात पहिला रुग्ण आढळून आला असून, त्याच्या दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हिरे रुग्णालय प्रशासनासह संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. हा रुग्ण सध्या स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आला असून, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. धुळे महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांना यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत.
मंकी पॉक्स बाधित रुग्ण २ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून भारतात आला होता. तो सध्या धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे वास्तव्यास आहे. गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात राहत होता आणि आपल्या मुलीच्या विवाहासाठी तो धुळ्यात आला होता. परंतु भारतात आल्यानंतर काही दिवसातच त्याला त्वचेवर पुरळसदृश लक्षणे दिसू लागली आणि त्याने ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावली.
तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्याच्यावर मंकी पॉक्सची लक्षणे आढळून आल्याने तातडीने महापालिका आरोग्य पथकाला बोलवण्यात आले. रुग्णाचे रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (NIV) तपासणीसाठी पाठविण्यात आले. पहिल्या चाचणी अहवालात मंकी पॉक्सची पुष्टी झाल्यानंतर डॉक्टरांनी खात्री करण्यासाठी दुसऱ्यांदा नमुने घेतले. दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली.
पुण्यातील एनआयव्हीने देखील धुळ्यात आढळलेला हा रुग्ण महाराष्ट्रातील मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मंकी पॉक्सच्या दोन प्रमुख व्हेरीयंटपैकी ‘क्लेड-1’ हा अत्यंत संसर्गजन्य प्रकार भारतात विरळ प्रमाणात आढळतो आणि धुळे रुग्णाला याच प्रकारचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशभरात आतापर्यंत या व्हेरीयंटचे केवळ ३५ रुग्ण आढळले असून, महाराष्ट्रात ही पहिलीच केस आहे.
सदर रुग्णाला मधुमेह (डायबेटीज) असल्याने त्याचे उपचार अधिक काळ चालणार आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या स्थिर असून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



