
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत मोतीबिंदूचे निर्मूलन करण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत १० जूनपासून यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये २४ टप्प्यांत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नेत्र विभागासह इतर आजारांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत.
तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान विशेष लाभदायी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत असून डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे तपासणी व उपचाराची जबाबदारी सांभाळणार आहेत.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत विविध गावांतील हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शेकडो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे. १० जूनपासून सुरू होणाऱ्या या गावोगावी नेत्रतपासणी शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.



