आ. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक; सोशल मीडियात ट्रोल

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना सोशल मीडियातून जबरदस्त ट्रोल केले आहे. तर स्वत: आमदार चव्हाण यांनी अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

भारतीय जनता पक्षातर्फे दूध दरवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. या अनुषंगाने चाळीसगाव शहरातही भाजपचे आंदोलन झाले. याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांना संबोधित करतांना आमदार मंगेश चव्हाण हे घसरले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करतांना त्यांनी अपशब्दाचा वापर केल्याने खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळ पासूनच स्थानिक पातळीवरून याबाबत नाराजीचा सूर उमटला. तर रविवारी दिवसभर याचे अतिशय व्यापक स्वरूप धारण केले. आता राज्यभरात आमदार मंगेश चव्हाण यांचे अपशब्द पोहचले असून याबाबत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

शिवसेनेच्या जळगावसह राज्यातील पदाधिकार्‍यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना मोबाईलवर कॉल करून जाब विचारला. त्यांनी काही जणांना उत्तरे दिली. मात्र नंतर वाढणारे कॉल पाहून त्यांनी बराच वेळ मोबाईल बंद करून ठेवला. शिवसैनिकांनी आमच्या मदतीनेच तुम्ही आमदार बनले असल्याची चव्हाण यांना आठवण करून दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागल्यानंतर मंगेश चव्हाण यांना कॉल करून प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचविले होते. आमदार व त्यांच्या समर्थकांनी ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल केली होती. आता चौकशी करणार्‍या मुख्यमंत्र्यांनाच अपशब्द वापरण्याचे कारण काय ? असा प्रश्‍न शिवसैनिकांनी उपस्थित करत मंगेश चव्हाण यांना जबरदस्त ट्रोल केले आहे.

स्वत: आमदार मंगेश चव्हाण हे टेक्नोसॅव्ही असून ते नवमाध्यमाचा विपुल प्रमाणात वापर करतात. त्यांच्याकडे स्वत:ची अतिशय मोठी सोशल मीडियाची टिम देखील आहे. तथापि, या प्रकरणावर अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, आमदारांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून त्यांना पाठींबा देण्यास प्रारंभ केला आहे. तर दुसरीकडे आज शिवसैनिक आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे.

Protected Content