खडसे कुटुंबाच्या विरोधात आ. चंद्रकांत पाटील उच्च न्यायालयात !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ. एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल १३७ कोटी रूपयांच्या दंडमाफीच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून यामुळे कोर्टात नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील भुखंडांमधून विना परवाना गौणखनिजाचे उत्खनन केल्या प्रकरणी महसूल प्रशासनाने आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई, रोहिणी खडसे आणि मंदाताई खडसे यांच्यावर कठोर कारवाई केली होती. यामध्ये १८ हजार २०२ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या अनुषंगाने पहिल्यांदा नोटीस बजावत नंतर त्यांना एकत्रीतपणे तब्बल १३७ कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. एवढेच नव्हे तर या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाने खडसे कुटुंबाच्या मालमत्तांवर बोजे चढविण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली होती. यामुळे खडसे कुटुंबाच्या राजकीय वाटचालीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर पडद्याआड मोठ्या घडामोडी घडल्या. या प्रकरणी नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करण्यात आले नसल्याचा युक्तीवाद एकनाथ खडसे यांच्यातर्फे करण्यात आला. यामुळे राज्य शासनाच्या एसआयटीने या कारवाईला स्थगिती दिली होती. यानंतर रक्षाताई खडसे यांना भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या कारवाईला स्थगिती दिल्याच्या विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या रवींद्र घुगे आणि न्या. आर.एम. जोशी यांच्या खंडपिठासमोर याची सुनावणी होणार आहे. या संदर्भात खंडपीठाने आता एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि मंदाताई खडसे यांच्यासह नाशिकचे महसूल आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी आणि भुसावळच्या प्रांताधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार असून यात नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content