तीन कृषी कायदे रद्द होण्यासाठी घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध – डॉ. विवेक सोनवणे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी विरोधक कायदे रद्द व्हावे यासाठी शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली आंदोलन करीत आहेत. कृषी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारला आज ७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या निषेधार्थ मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार २६ मे रोजी प्रहार संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.

मोदी सरकारने सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली. ५० टक्के नफा धरून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. परंतु मोदी सरकार सत्तेत येताच त्यांना त्यांच्या या वचनाचा विसर पडला व मोदी सरकारने शेतकऱ्यांचा नफा तर वाढविलाच नाही. परंतु उत्पादन खर्चात २० टक्क्यांपर्यंत वाढ केली व ही वाढ हमीभाव जाहीर करताना त्यात ग्राह्य धरण्यात आली नाही. तसेच देशात तूर, मूग, उडीद या धान्याचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त असूनही या धान्याची आयात बाहेरून करण्यात आली. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे कमी भाव मिळतील, तोच तो दृष्टिकोन ठेवून मोदी सरकारने ही आयात केली. मेक इन इंडिया, मेड इन इंडियाच्या नावाखाली निर्यात बंद केली. भरड धान्य प्रतिबंधित वर्गवारीमध्ये असताना त्यावर प्रतिबंध उठवले. जेणेकरून देशातील मोठ्या उद्योजक व्यापाऱ्यांना बाहेरून धान्याची आयात करता येणे सोपे होईल. तसेच रासायनिक खतांचा मध्येसुद्धा २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे मोदी सरकार वागताना मात्र शेतकऱ्यांशी सूडबुद्धीने वागत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच त्यांनी हे तीन सुलतानी कृषी विषयक कायदे अस्तित्वात आणले व या कायद्याविरोधात आजपर्यंत शेकडो शेतकरी शहीद झाले. परंतु मोदी सरकारला या शेतकऱ्यांशी काहीच घेणे देणे नसून हे मोदी सरकार कॉर्पोरेट जगताच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसून येत आहे. व्यापारी उद्योजकांना जास्तीत जास्त कसा फायदा करता येईल, यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून मोदी सरकारला आज ७ वर्षे पूर्ण होत असून त्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन स्वप्न भंग केले. अशा या सुलतानी कृषी कायदे करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ आज आपल्या घरावर काळे झेंडे लावून जाहीर निषेध करण्यात येत आहे.

याप्रसंगी प्रहार संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे, अंतुर्ली येथील माजी सरपंच विलास किसान पांडे, अशोक सपकाळ, चंद्रमणी शिरतुरे, हर्षल धनगर, फरताडे येथील अनिल दौलत काणे, ईश्वर कोळी, कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी ,पिंप्राळा येथील ग्रामपंचायत सदस्य विशाल झाल्टे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

Protected Content