ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे पक्ष्यांकरीता परळ वाटप

चाळीसगांव, प्रतिनिधी । ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष अशोक राठोड यांच्याकडुन टाकळी प्र.चा. येथे बुद्ध जयंतीचे औचित्य साधुन पक्षांकरीता परळ (दुधी भोपळ्यापासुन बनविलेले) वाटप करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्रोत म्हणजे गौतम बुद्ध, या शब्दात बुद्धाची महती वर्णिली जाते. अखिल मानवजातीचे, पशू-पक्ष्यांचे, कीटक-पतंगाचे आणि सर्व चराचरांचा कल्याण करणारे भगवान तथागत, सम्यक सम्बुद्ध, महाकरुणिक, महानुकंपाय, अरिहंत जन्माला आल्याच्या या दिवशी ‘बुद्ध जयंती’ साजरी केली जाते. या शुभ दिनी अशोक राठोड यांनी दुधी भोपळ्यापासुन अथक परीश्रमाने तयार केलेले पक्षी पाणपोईंचे द्रोणाचे वाटप करुन त्यांच्या या सत्कृत्याद्वारे भगवान गौतम बुद्धास विनम्रपणे अभिवादन दिले.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

पाण्याअभावी पक्षी तडफडु लागतात तर कधी उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहेत सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहे. याकरीता पक्षी पाणपोईंचा स्तुत्य उपक्रम गावोगावी अशोक राठोड यांच्याकडुन राबविला जात आहे. या प्रसंगी संपादक योगेश्वर राठोड, राहुल पाटील, गौरव शिंपी, ललित पाटील आदी उपस्थित होते. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होतांना दिसुन येत आहे.

Protected Content