धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव धनराज योगराज सावंत (पाटील) असून त्यांचे वय ४९ वर्षे होते. ते चमगाव येथे पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि जावईसह राहत होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, धनराज सावंत यांच्यावर विविध कारणांमुळे वि. का. सो. चे कर्ज झाले होते. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते मानसिकदृष्ट्या खचले होते. यातूनच त्यांनी सोमवारी १९ मे रोजी संध्याकाळी आपल्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांनी वेळीच लक्ष देऊन त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे चमगावमध्ये शोककळा पसरली आहे.