डोंगर कठोरा येथे बाल संस्कार शिबिर व कीर्तन सोहळ्याचा यशस्वी समारोप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत श्री गुरुदेव दत्त गुरुकुल आश्रम मायसांगवी संचलित ह.भ.प. श्रीमहंत देवेंद्रदास महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित बाल संस्कार शिबिर व कीर्तन सोहळा यशस्वीरित्या पार पडला. १ मे ते २१ मे या कालावधीत चाललेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश मुलांना संस्कारी, नीतिवान, शूरवीर, साहसी आणि आदर्श व्यक्तिमत्व बनवून एका नवीन भारताच्या उदयाला हातभार लावणे हा होता.

या शिबिरात बालकीर्तनकारांना गायन, वादन आणि कीर्तन कसे करावे याचे शिक्षण देण्यात आले. २० मे रोजी शिबिराचा अविभाज्य भाग म्हणून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात बालकीर्तनकारांनी सादर केलेली पावली, फुगडी आणि अभंग यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.

या दिंडी सोहळ्यात ह.भ.प. रवी पाटील महाराज, ह.भ.प. दत्तात्रय गुरव महाराज, आयोजक ह.भ.प. खुशाल महाराज, ह.भ.प. दिनेश महाराज, ह.भ.प. गणेश महाराज, ह.भ.प. मोहिनीताई महाराज यांच्यासह डालू फेगडे, दिनकर पाटील, मधुकर पाटील, नितीन पाटील, प्रवीण गाजरे, युवराज फेगडे, डिगंबर तेली, प्रशांत लोहार आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

आज, २१ मे रोजी या बाल संस्कार शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचा समारोप झाला. या समारोपानिमित्त महाप्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. आयोजक ह.भ.प. खुशाल महाराज यांनी ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक भक्तांनी या समारोपाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले होते. या शिबिराने बालकांमध्ये चांगले संस्कार रुजवून त्यांना एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

Protected Content