Home पर्यावरण जामुनझिरा परिसरात बिबट्याचे दर्शन ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

जामुनझिरा परिसरात बिबट्याचे दर्शन ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या जामुनझिरा गावठाण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आदिवासी वस्तीतील कुटुंबे आणि शेतकरी चिंतेत सापडले असून परिसरात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील जामुनझिरा हा सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला आदिवासी पाडा असून येथील गावठाणाजवळ अचानक बिबट्या दिसल्याची घटना घडली. मोहराळे येथील ट्रॅक्टर चालक गजानन रामकृष्ण पाटील हे आपल्या शेतातील काम आटोपून पाच ते सहा मजुरांसह परतत असताना ही घटना घडली. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरच्या प्रकाशझोतात अचानक बिबट्या दिसून आला. ट्रॅक्टरचा वेग वाढवून आणि प्रखर लाईटमुळे गोंधळलेल्या बिबट्याने तत्काळ पळ काढल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर जामुनझिरा व परिसरातील आदिवासी कुटुंबांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. विशेषतः शेतमजूर आणि शेतकरी यांच्यात चिंता वाढली असून रोजच्या कामांवर त्याचा परिणाम होत आहे.

दरम्यान, वाढते तापमान आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही या प्रकारामागील प्रमुख कारणे असल्याचे स्थानिकांचे मत आहे. जंगलातील अधिवास नष्ट होत असल्याने वन्य प्राणी आता गावांकडे आणि शहरी भागाकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहराळे येथील सामाजिक कार्यकर्ते लहू पाटील आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पगमार्गांची तपासणी केली. तपासणीनंतर हा प्राणी बिबट्याच असल्याची पुष्टी वनपाल एस. पी. हेंदी यांनी केली आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून परिसरात गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound