अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील मंगरूळजवळ २० मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एका भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मंगरूळ येथील गॅनी ढाब्याजवळ झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताडेपुरा (ता. अमळनेर) येथील भटू दिलीप पाटील (वय २९) हे आपल्या रिक्षा क्रमांक एमएच ४१ एएक्स १३५६ वरून लोंढवे येथे प्रवासी सोडून परत अमळनेरकडे येत होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगात येणारी चारचाकी (एमएच १८ एजे ५५८८) अचानक त्यांच्या रिक्षावर आदळली. धडक इतकी भीषण होती की भटू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. अपघाताची गंभीरता लक्षात घेता चारचाकी चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील (रा. दहिवद) याच्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत.