नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने चांगल्या स्थितीत असणाऱ्या सरकारी कंपन्यांमधील स्ट्रॅटेजिक हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला असून सचिवांच्या एका गटाने नुकतीच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), बीईएमएल, कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकोर) आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एससीआय) स्ट्रॅटेजिक हिस्सा विक्रीला मंजुरी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन सरकारी वीज उत्पादक कंपन्या THDC इंडिया आणि NEEPCO च्या स्टेक विक्रीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या दोन कंपन्या एनटीपीसी खरेदी करण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेबाबत माहिती असलेल्या दोन सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट देखील तयार करण्यात आले आहे. याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर या कंपन्यांच्या विक्रीची औपचारिक प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच एका अधिकाऱ्याने सांगितले की. ‘या सरकारी कंपन्यांच्या स्टेक विक्रीला फास्ट ट्रॅक करण्यात आले आहे. सरकारने या वित्तीय वर्षात गुंतवणुकीच्या माध्यमातून १.०५ लाख कोटी रुपये उभे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. २०१७-१८ मध्ये १ लाख कोटीच्या लक्ष्याहून अधिक रक्कम प्राप्त झाली होती. २०१८-१९ मध्ये ८०००० कोटी रुपयांच्या लक्ष्याहनून अधिक रक्कम प्राप्त करण्यात आली होती. एअर इंडियासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टबाबत अंतिम निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील पंधरवड्यात याला मंजुरी देण्याची शक्यता आहे, असेही अधिकारी म्हणाला. सरकार सुमारे ३०००० कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.