अंबानींच्या घराजवळ स्फोटकं कुणाच्या सांगण्यावरून ठेवली?; राज ठाकरेंची केंद्राकडे चौकशीची मागणी

 

 मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

 

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना १२००  कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

 

“आपण मूळ विषय विसरत आहोत.  अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय सगळेच असा विचार करत होतो की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात. पण, बॉम्ब पोलीस ठेवतात, असं आपण कधी ऐकलेलं नाही. यात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली,” अशी टीका राज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

 

“मुळात मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील,” असा गौप्यस्फोट राज यांनी केला आहे.

Protected Content