अवघा रंग एक झाला…….कंगनासाठी संघही “दक्ष” !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अभिनेत्री कंगना रानौत हिच्या मुंबईतील पाली हिल भागात स्थित असलेल्या कार्यालयाची मुंबई महानगरपालिकेकडून तोडफोड करण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या या कारवाईला स्थगिती दिलीय. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही या वादात उडी घेतलीय. भाजपनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीही कंगनाला पाठिंबा व्यक्त केलाय.

आरएसएसचे अखिल भारतीय सहप्रमुख रामलाल यांनीही एक ट्विट केलंय. ‘असत्याच्या हातोड्यानं सत्याचा पाया रचला जाऊ शकत नाही’ असं रामलाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. उल्लेखनीय म्हणडे, कंगना रानौत हिनं आपल्या कार्यालयावरील कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलंय.

देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना मुंबईत मात्र कंगना रानौत विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय. संक्रमणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात अग्रेसर आहे. या मुद्द्याचं राजकारणही होताना दिसतंय. कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांकडून उघडपणे पाठिंबा व्यक्त करण्यात आलाय. भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि नेते तेजेंदर पाल सिंह बग्ग यांनीदेखील कंगनाच्या समर्थनार्थ ट्विट केलंय.

सुडाचं राजकारण करत कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईमुळे शिवसेनेवर मात्र जोरदार टीका होतेय. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत या वादातून हात झटकलेत. ‘अनावश्यक कारवाई केल्यामुळे उद्धव सरकारनं लोकांना टीका करण्याची संधी दिल्याची’ प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केलीय.

Protected Content