बांगला देशींच्या  भारतीय नागरिकत्वासाठी एम आय एम आमदारांच्या पत्रांचा वापर

मुंबई : वृत्तसंस्था । बांगलादेशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटरहेडचा वापर करण्यात आला असल्याची खळबळजनक माहिती भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व देशभर सक्रीय असलेल्या या टोळीतील लोकांकडे एमआयएमच्या आमदारांचे कोरे लेटरहेड देखील आढळले असल्याचे, भातखळकर म्हणाले आहेत.

”देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा” अशी मागणी करत, ”लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय?” असा प्रश्न देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी या कारस्थानाची एनआयए कडून चौकशी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहे.

आमदार भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, ”बांगलादेशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळवून देणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी मुंबई पोलिसांनी पकडली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महारष्ट्र विधानसभेतील एमआयएमचे दोन आमदार शेख रशीद व इस्माईल या दोघांच्या लेटरहेडचा वापर करून, ही टोळी संपूर्ण देशभरात कार्यरत आहे. या दोन्ही आमदारांची अनेक लेटरहेड यांनी वापरलीच, पण पोलिसांना या दोन्ही आमदारांची कोरी लेटरहेड ही देखील या लोकांकडे सापडली. जे पुर्णतः बेकायदेशीर आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांची त्वरीत चौकशी करून त्यांना अटक करण्याची मागणी मी करतो आहे.”

”ही टोळी संपूर्ण देशात कार्यरत आहे. त्यामुळे हे देशद्रोही कृत्यामध्ये सामील होण्यासारखं आहे. याचा तपास हा एनआयएच्या माध्यमातून केला जावा, अशी देखील मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करतो आहे.” असंही भातखळकर यांनी म्हटले आहे.

Protected Content