चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील मामळदे येथे मंगळवारी १३ मे दुपारच्या सुमारास एका दुर्दैवी घटनेत ३५ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला. अनिता अनिल पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता पाटील या त्यांच्या कुटुंबासोबत मावळते गावात वास्तव्यास होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्या आपल्या घरी दैनंदिन कामे करत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्या गंभीररित्या जखमी झाल्या आणि जागीच बेशुद्ध पडल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेत अनिता यांना उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. एका तरुण आणि हसत्या-खेळत्या महिलेचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि इतर कुटुंबीय आहेत. या दुर्दैवी घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.