पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या माध्यमातून पाचोरा शहरातील नगरपालिकेच्या स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवनात आज, १४ मे रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी सहाय्यक साहित्य व उपकरणांचे मोफत वाटप तसेच पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराला परिसरातील अनेक वयोवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती पहायला मिळाली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कांतीलाल जैन, ज्येष्ठ नेते रमेश वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिष टाक, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी वयोवृद्धांना शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या.
या शिबिरात वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांची शारीरिक तपासणी करून त्यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सल्ल्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच, ज्या वयोवृद्धांना चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, चष्मा किंवा इतर कोणत्याही सहाय्यक उपकरणांची गरज आहे, त्यांची नोंदणी करण्यात आली. लवकरच त्यांना ही उपकरणे मोफत वितरित केली जाणार आहेत.
खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे आयोजित या शिबिरामुळे अनेक गरीब आणि गरजू वयोवृद्ध नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. या उपक्रमाबद्दल वयोवृद्धांनी समाधान व्यक्त केले आणि खासदार वाघ यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गोविंद शेलार यांनी केले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी दिशा मिळाली.