Home आरोग्य टायफॉईडमुळे जीवाला धोका; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे जीवाला धोका; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन

0
12


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टायफॉईडच्या गंभीर संसर्गामुळे आतड्याला छिद्र पडलेल्या 35 वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

सदर रुग्णाला ताप, तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि उलट्यांचा त्रास होत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत टायफॉईडच्या संसर्गामुळे लहान आतड्याला छिद्र पडल्याचे निदान झाले. ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी आणि आयलिओस्टॉमी ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या प्रक्रियेत डॉ. अपूर्वा गवई आणि डॉ. प्रणव शेवाळे यांनी सहकार्य केले. तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शीतल ढाके यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरच्या उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवून विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार करण्यात आले. डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि आरोग्यसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी डॉ. चैतन्य पाटील यांनी सांगितले की, टायफॉईडचा संसर्ग वेळेत नियंत्रणात न आल्यास आतड्याला छिद्र पडण्यासारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ताप, पोटदुखी किंवा उलट्यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने अशा गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.


Protected Content

Play sound