Home आरोग्य मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८,५५२ रुग्णांची तपासणी, ६८९ शस्त्रक्रिया...

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८,५५२ रुग्णांची तपासणी, ६८९ शस्त्रक्रिया यशस्वी

0
2

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ या विशेष अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० जूनपासून सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत तब्बल ८ हजार ५५२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, ६८९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

जागतिक दृष्टिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिबिरांमध्ये डोळ्यांच्या आजारांसह इतर आरोग्यविषयक समस्यांचीही तपासणी केली जात असून, आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे. अभियानाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ९२२ रुग्णांना आयपीडीमध्ये दाखल करून उपचार देण्यात आले. तपासणीदरम्यान मोतीबिंदू तसेच इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत ३७९ मेजर आणि ३१० मायनर अशा एकूण ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.

या अभियानाचा विशेष लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. गावोगावी जाऊन नेत्र तपासणी केल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान वेळेत होत आहे. वेळेवर उपचार आणि शस्त्रक्रिया मिळाल्याने अनेक नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी प्राप्त होत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे. या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे रुग्णसेवेत कार्यरत आहेत.


Protected Content

Play sound