Home आरोग्य सुधाकर वारके अनंतात विलीन !

सुधाकर वारके अनंतात विलीन !

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील ज्येष्ठ समाजभिमुख व्यक्तिमत्त्व, प्रगतशील शेतकरी आणि वारके परिवाराचे आधारस्तंभ म्हणून ओळख असलेले सुधाकर (बाबा) अभिमन वारके यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारके परिवारासह शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली असून आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वर्गीय सुधाकर (बाबा) वारके हे गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगावचे संचालक डॉ. प्रशांत सुधाकर वारके यांचे वडील तसेच डॉ. नीलिमा प्रशांत वारके यांचे सासरे होते. दिनांक २ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिचितांनी वारके कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सुधाकर (बाबा) वारके यांनी आपल्या आयुष्यात परिश्रम, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला होता. ते एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. शिक्षणाला अत्यंत महत्त्व देणाऱ्या बाबांनी त्या काळात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीएससी पदवी संपादन केली होती. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीचा मार्ग न निवडता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मेहनतीच्या आणि व्यावसायिक दृष्टीकोनाच्या जोरावर कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती घडून आली.

अंत्यसंस्कारावेळी विदगाव परिसर जनता विद्या प्रसारक मंडळ शाळेचे माजी मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वर्गीय वारके यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बाबा वारके हे विद्यालयाबद्दल नेहमी आत्मीयतेने विचारपूस करत असत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या निधनामुळे विद्यालयाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात वारके कुटुंबाच्या जडणघडणीतील बाबांच्या भूमिकेचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, चौघे भाऊ एकत्र राहून मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. लहानपणीच्या कठीण परिस्थितीची जाणीव ते मुलांना करून देत असत. कुटुंबातील मूल्ये, शिस्त, परिश्रम आणि एकोप्याचा वारसा त्यांनी पुढील पिढीपर्यंत पोहोचवला. बीएससी झाल्यानंतर अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला. वारके परिवाराकडून शिकण्यासारखे खूप काही असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी शांती मंत्राचे पठण करून स्वर्गीय सुधाकर (बाबा) वारके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली. उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय सुधाकर (बाबा) वारके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केवळ वारके परिवाराचाच नव्हे, तर शिक्षण, समाजकारण आणि कृषी क्षेत्राशी निगडित अनेकांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound