आपल्या दुकानाच्या पाट्या मराठीतच करा : जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन  

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर नियमानुसार शासन कारवाई करणार असून शासनाच्या निर्देशांचा आदर करीत प्रत्येकाने आपापले दुकान, आस्थापनेचं नामफलक मराठीत करून घ्यावेत, असे आवाहन आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठीतून प्रदर्शित करणे अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बदलांबाबत सुविधाकर तथा दुकान निरीक्षकांकडून जिल्हाभरात तपासणी सुरू करण्यात आली असून मराठी नामफलक  नसलेल्या दुकानांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांचा आदर करीत प्रत्येकाने आपले दुकान, आस्थापनेचा नामफलक मराठीत लावून घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांनी केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक दुकान, आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे अनिवार्य आहे. परंतु दुकान, आस्थापनेच्या मालकाकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात.

शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरवले किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशा सक्त सूचना सहाय्यक कामगार आयुक्त चं.ना.बिरार यांनी केल्या आहेत.

शासनाच्या आदेशाचे पालन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी नामफलकात बदल करून घ्यावे.  कारवाई टाळण्यासाठी नियमानुसारच वागावे आणि लवकरात लवकर आवश्यक तो बदल करावा, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content