Home आरोग्य वयाच्या १२ व्या वर्षी व्यसनाच्या गर्तेत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयामुळे बालकाला मिळाली...

वयाच्या १२ व्या वर्षी व्यसनाच्या गर्तेत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयामुळे बालकाला मिळाली नवी दिशा

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी शालेय शिक्षण घेणाऱ्या एका बालकाच्या हातात पुस्तकांऐवजी मद्याची बाटली आणि नशायुक्त पदार्थ पोहोचल्याने त्याच्या कुटुंबासमोर गंभीर संकट उभे राहिले होते. मात्र, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या वेळेवर केलेल्या उपचार आणि समुपदेशनामुळे या बालकाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला असून त्याचे मन आता शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळू लागले आहे.

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारा हा १२ वर्षीय मुलगा शालेय शिक्षण घेत असताना चुकीच्या मित्रसंगतीच्या प्रभावाखाली आला. सुरुवातीला उत्सुकतेपोटी मद्यपानाची सवय लागली. त्यानंतर नशेचा प्रभाव वाढविण्यासाठी त्याने गांजाचे सेवन सुरू केले. इतकेच नव्हे तर पुढे सोल्युशनसारख्या घातक पदार्थांच्या व्यसनाकडेही त्याची पावले वळली. अल्पवयातच विविध नशायुक्त पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या या बालकाच्या वर्तनात मोठे बदल दिसू लागले.

व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर बालकाचा स्वभाव चिडचिडा बनला. त्याच्या आहारात घट झाली आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले. मुलाच्या बदललेल्या वागणुकीमुळे आणि ढासळणाऱ्या प्रकृतीमुळे पालक चिंतेत पडले. अखेर त्यांनी मुलाला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांच्या पथकाने बालकाची सखोल तपासणी केली. यामध्ये सीटी स्कॅनसह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र केवळ औषधोपचारांवर भर न देता समुपदेशनालाही तितकेच महत्त्व देण्यात आले. बालकाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून त्याला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विविध सकारात्मक उपक्रम आणि कलात्मक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

या उपचार प्रक्रियेत डॉ. हुमेद महाडिक, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. ऋचिता आटे, डॉ. सोनाजी गायके, डॉ. निकिता खाटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. फरीन सुरैय्या आणि डॉ. रेशल श्रीवास्तव यांच्या तज्ज्ञ पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. देवांश गणात्रा यांनी सांगितले की, बालकाला चुकीच्या मित्रसंगतीमुळे व्यसनाची सवय लागली होती. आसपासचे वातावरण आणि संगत व्यक्तीच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव टाकत असते. त्यामुळे या प्रकरणात औषधोपचारांसोबतच सातत्यपूर्ण समुपदेशनाचा अवलंब करण्यात आला. दोन्ही उपचार पद्धतींच्या संयुक्त परिणामामुळे बालकाला व्यसनमुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे मार्गदर्शन करता आले.

अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर ही घटना पालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा मानली जात आहे. मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या वागणुकीतील बदल वेळेवर ओळखणे किती आवश्यक आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. योग्य वेळी उपचार आणि समुपदेशन मिळाल्यास व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या मुलांनाही नवजीवन मिळू शकते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

 


Protected Content

Play sound