बाळासाहेब, सुरेशदादा आणि नाथाभाऊ : एक अनोखा योगायोग !

जळगाव, राहूल शिरसाळे ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | सगळीकडे खडसे संपल्याची हाकाटी उठली असतांना वयाच्या एकोणसत्तरीत एकनाथराव खडसे यांना विधानपरिषदेवर मिळालेली संधी ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. याचे अनेक राजकीय अर्थ तर आहेच, पण जळगाव जिल्ह्यातील कधी काळी एकछत्री अंमल असणारे बाळासाहेब चौधरी आणि सुरेशदादा जैन नेमक्या ज्या वयात रिटायर्ड झालेत तेथूनच खडसेंनी भरारी घेतल्याचा योगायोग आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे.

१९२९ साली जन्मलेले मधुकरराव चौधरी हे १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कधीही विधीमंडळात गेले नाही. तर 1943 साली जन्मलेले सुरेशदादा हे २०१४ नंतर राजकीय विजनवासात गेले. अर्थात, वयाच्या सत्तरीत या दोन्ही मान्यवरांना सक्तीने सेवानिवृत्ती पत्करावी लागली. तर याच्या अगदी उलट म्हणजे दोन महिन्यात ६९ वर्षांचे होणार्‍या एकनाथराव खडसे यांना विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. आता ते सहा वर्षे म्हणजे वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत आमदार राहणार आहेत. पुढे जरी संधी नाही मिळाली तरी पंच्याहत्तरीत एका प्रदीर्घ राजकीय करियरमधून सन्मानपूर्वक निरोपाचे भाग्य त्यांना लाभणार आहे.

मधुकरराव चौधरी आणि सुरेशदादा जैन यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर विलक्षण हुकुमत गाजविली आहे. तर एकनाथराव खडसे यांनी देखील संपूर्ण जिल्ह्याचे सूत्रे सांभाळली आहेत. आता आमदारकीच्या माध्यमातून त्यांना विधीमंडळात प्रवेश मिळाला तरी जिल्ह्याची सूत्रे त्यांच्या हातात येतील की नाही ? याबाबत आज काहीही सांगता येणार नाही. कारण त्यांना मंत्रीपद मिळणे वा न मिळणे. मिळाले तरी यात अनेक तांत्रीक बाबींचा अडसर असल्यामुळे नाथाभाऊ हे आधीप्रमाणे एकहाती सत्ता नक्कीच गाजवू शकणार नाहीत. तथापि, बाळासाहेब चौधरी आणि सुरेशदादा जैन यांना जसे राजकीय क्षितीजावरून अचानक अस्तंगत व्हावे लागले, अशा फेजमधून खडसे हे पुढे सरकले आहेत. त्यांना सन्मानजक निरोप मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अजून एक मातब्बर नेत्या असणार्‍या सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या नशिबात तर यापेक्षा मोठा योग आला. राजकारणातून सेवानिवृत्त होऊन अगदी निवांतपणे आयुष्य व्यतीत करणार्‍या ताईंना आधी राज्यपाल आणि नंतर थेट राष्ट्रपतीपदाची संधी लाभली. आणि त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीची यशस्वी सांगता झाली. अर्थात, राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे राजकीय नव्हे तर संवैधानिक असल्याची बाब लक्षात घ्यावी लागणार आहे. आणि ज्यांच्या नशिबात हा दुर्मीळ योग आला त्या प्रतिभाताईंची कर्मभूमि देखील मुक्ताईनगरच असावी हा त्याहून मोठा अनोखा योगायोग !

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: