मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान स्टॉल चालकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणावरून आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत शहरातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा जोरदारपणे मांडला असून सरकारला कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ येथील जळगाव नाका परिसरात एका पान स्टॉल चालकावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यास विलंब झाला का, तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असा सवाल उपस्थित केला.

खडसे यांनी सभागृहात सांगितले की, या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना निर्माण झाली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून विलंब झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता फिर्यादी आणि त्यांचा मित्र पान स्टॉलवर उभे असताना चार अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. विरोध झाल्यानंतर झटापट झाली आणि आरोपींनी गोळी झाडल्याने फिर्यादी जखमी झाले. या प्रकरणी १८ डिसेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात BNS कलम ३११, ३१२ आणि आर्म्स ॲक्ट ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान या गुन्ह्यात चार विधी संघर्ष बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी तीन बालकांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र सध्या बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. उर्वरित एका आरोपीचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गस्त वाढवण्यात आली असून डायल ११२, दामिनी पथक आणि बीट पेट्रोलिंगद्वारे तात्काळ पोलीस मदत पुरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत MPDA अंतर्गत ६ कारवाया, मपोका कलम ५५ अंतर्गत २, कलम ५६ अंतर्गत ४४ आणि कलम ५७ अंतर्गत २ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
दरम्यान, आमदार खडसे यांनी हा मुद्दा विधान परिषदेत मांडल्यामुळे भुसावळमधील गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील काळात प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



