अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथे ग्रामदैवत भवानी मातेचा पारंपरिक यात्रोत्सव उद्या (दि.२६) चैत्र अष्टमीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा होत असून, नवस फेडण्यासाठी भाविकांची दोन दिवसांपासूनच मोठी गर्दी उसळली आहे.
गावाच्या दक्षिणेला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले भवानी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात दरवर्षी चैत्र अष्टमीला यात्रोत्सव भरतो. गोल घुमटाकार रचनेचे हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, नवस पूर्ण झाल्याचा अनुभव अनेकांना आल्याने येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. मंदिरात दरवर्षी वरण-बट्टीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जात आहे.

कळमसरे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शहापूर रस्त्यालगत मोठ्या भवानी मातेचे मंदिरही आहे. यात्रेच्या दिवशी पहाटे पाच वाजता दोन्ही मंदिरांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी सहा वाजता महापूजा होणार असून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या भवानी मातेचे सेवेकरी दंगल बडगुजर आणि लहान भवानी मातेचे सेवेकरी रामलाल महाजन हे व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील सैंदाणे परिवारात नवस फेडण्याचा विशेष मान आहे. माळी समाजातील या कुटुंबात दरवर्षी दुर्गाष्टमीला कुलदैवत इंदासी मातेचा नवस फेडण्याची परंपरा आहे. गावातील सुमारे ३०० कुटुंबांचा या परिवारात समावेश असून, दरवर्षी किमान १० ते १५ कुटुंबांत नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडतो. सकाळी दहा वाजता वाजत-गाजत सैंदाणे परिवार एकत्र येऊन नवस फेडण्यासाठी जातात, यावेळी गावात उत्सवी वातावरण निर्माण होते.
यात्रोत्सवासाठी गावात विविध उपहारगृहे, खेळण्यांची दुकाने आणि इतर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक रंगतही यात्रेत पाहायला मिळणार आहे.



