Home Cities जळगाव शिवसेना-उबाठात भाऊबंदकीला उधाण : एका जागेसाठी दोन प्रस्तावांमुळे पेच !

शिवसेना-उबाठात भाऊबंदकीला उधाण : एका जागेसाठी दोन प्रस्तावांमुळे पेच !

0
255


जळगाव-राहूल शिरसाळे । आज स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने चक्क दोन प्रस्ताव सादर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या पक्षातील अंतर्गत कलह नव्याने समोर आला आहे.

आज जळगाव महापालिकेसाठी स्वीकृत सदस्य निवडीचे प्रस्ताव सादर करतांना मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. यात प्रामुख्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमुळे वाद निर्माण झाला आहे.

विद्यमान गटनेते इब्राहीम पटेल यांनी पक्षाचा आदेश झुगारून स्वीकृत नगरसेवकपदाचा प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली लक्षात घेऊन कालच जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी अर्शनाबी शोएब खाटीक यांना गटनेते बनवण्यात यावे असे पत्र विभागीय आयुक्तांना दिले. यानंतर त्यांच्या वतीने आज पक्षाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

तर दुसरीकडे इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित सोळुंके यांच्या नावाचा वेगळा प्रस्ताव सादर केला. अर्थात शिवसेना-उबाठा पक्षाच्या वाटेला आलेल्या एका जागेसाठी दोन नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यामुळे आता प्रशासन नेमका कुणाचा प्रस्ताव स्वीकारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे चित्र आता २७ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे.

या सर्व गोंधळात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत कलह नव्याने जगासमोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना-उबाठा पक्षाचा त्याग करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. यानंतर जळगाव महापालिकेतील वादामुळे पक्षातील भाऊबंदकी पुन्हा चर्चेत आली आहे.


Protected Content

Play sound