Home करियर चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या ओम पाटीलचा जैन इरिगेशनकडून सत्कार 

चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या ओम पाटीलचा जैन इरिगेशनकडून सत्कार 


 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवून धाडसाचे अद्वितीय उदाहरण घालून देणाऱ्या ओम पाटील या अल्पवयीन मुलाचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडतर्फे सन्मान करण्यात आला असून त्याच्या व त्याच्या भावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

दि. २५ मार्च रोजी जैन हिल्स येथे आयोजित कार्यक्रमात जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते ओम पाटील व त्याच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. ओमच्या धाडसाची दखल घेत भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने यापूर्वीच त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमात अशोक जैन यांनी ओमच्या भावाचा, दिवेश पाटील याचाही शैक्षणिक खर्च उचलण्याची घोषणा करून कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

घटनेनुसार, चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार अल्पवयीन मुले अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. त्या वेळी जवळच असलेल्या आठवीत शिकणाऱ्या ओमने क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली आणि अतुलनीय धाडस दाखवत एकामागून एक अशा चौघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्याच्या या शौर्यकृत्यामुळे चार निष्पाप जीव वाचले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ओमच्या धैर्याचे आणि त्याच्या संस्कारांचे विशेष कौतुक केले. अशोक जैन यांनी “ओमचे धाडस अफाट आहेच, पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याहून मोठे आहेत,” अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले. यावेळी अ‍ॅड. बाळकृष्ण पाटील, स्वरूप लुंकड तसेच कुटुंबीय उपस्थित होते.

ओम सध्या आठवीत शिक्षण घेत असून त्याचे वडील रवींद्र पाटील आणि आई सरलाबाई हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांना चिंता होती. मात्र जैन फाऊंडेशनच्या निर्णयामुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी हलकी झाली असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश देत धाडस आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ओम पाटीलसारख्या धाडसी मुलांचे प्रोत्साहन हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound