फुटलेल्या जलवाहिनीमुळे लाखो लिटर पाणी वाया; दुरुस्तीची मागणी


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, येथील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर शुद्ध पाणी गटारीत वाहून जात आहे. या प्रकारामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलवाहिनीची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

नितीन सोनार यांनी म्हटले आहे की, यावल शहराला सध्या पाणीटंचाई जाणवत असताना, शहरातील विस्तारित वसाहतींच्या क्षेत्रातील पांडुरंग सराफ नगर वस्तीकडे जाणाऱ्या वळणावरील रस्त्यावर असलेली जलवाहिनी एका आठवड्यात दोन वेळा फुटली आहे. यामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी गटारीतून वाहून जात असून, त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सोनार यांनी आरोप केला आहे की, नगर परिषद प्रशासन फुटलेल्या जलवाहिनीची केवळ थातूरमातूर जोडणी करून अव्वाच्या सव्वा बिले काढत आहे. त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे, जलवाहिनी वारंवार का फुटत आहे याची कारणे शोधून चौकशी करावी आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.