
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील चार होतकरू युवक-युवतींची मुंबई पोलीस प्रशासनासह केंद्रीय सुरक्षा सेवेत निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी उमेदवारांच्या गौरवार्थ किनगाव येथे सर्वधर्मीय समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या तरुणांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या सद्दाम सलीम खाटीक, रोहिणी अंकूश कोळी, इकबाल तडवी तसेच केंद्रीय राखीव सुरक्षा दल (CRCF) मध्ये नियुक्ती झालेल्या फारूख बिर्हाम तडवी यांचा शाल, पुष्पहार व सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे किनगाव परिसराचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
किनगाव येथे आयोजित सत्कार समारंभाला यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत उर्फ आबा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र ठाकूर, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक बबलू जर्नादन कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय जगदीश कोळी, अंकुश कोळी, सबदर तडवी, राजू साळुंके, सलीम मन्यार, शकील खाटीक, अलतमस खाटीक, तनवीर खाटीक, रऊफ खाटीक, मौसीम खाटीक, युनुस खाटीक, शोहेब खाटीक, करीम मन्यार तसेच खाटीक समाज बांधव आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी ग्रामीण भागातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांकडे वळावे, असे आवाहन केले. किनगावमधील या चार तरुणांनी केलेली मेहनत आणि मिळविलेले यश हे गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन या यशस्वी उमेदवारांचा सन्मान केल्याने सामाजिक ऐक्याचेही दर्शन घडले.
सत्कारमूर्तींनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि ग्रामस्थांना दिले. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळविता आले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात पोलीस सेवेत प्रामाणिकपणे कार्य करून समाजाची सेवा करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.



