Home Cities जळगाव कवितेतून पुन्हा जिवंत झाले बालकवी! भादली रेल्वे स्थानकावर निसर्गकाव्याची सुरेल मैफिल

कवितेतून पुन्हा जिवंत झाले बालकवी! भादली रेल्वे स्थानकावर निसर्गकाव्याची सुरेल मैफिल

0
10

भादली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निसर्गाच्या सौंदर्याला आपल्या काव्यप्रतिभेने अजरामर करणारे थोर निसर्गकवी ‘बालकवी’ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त भादली रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी भव्य ‘काव्य मैफिल’ आणि साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लेवा गणबोली साहित्य मंडळ आणि जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कवी, साहित्यिक, लेखक आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात बालकवींच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बालकवींच्या अजरामर साहित्यकृतींचे सामूहिक वाचन करून त्यांच्या काव्यविश्वाला उजाळा दिला. ‘औदुंबर’ या प्रसिद्ध कवितेतील ‘ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी लेवून निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून…’ या ओळींचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यासोबतच ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ आणि ‘ती फुलराणी’ या लोकप्रिय कवितांचेही वाचन झाले.

बालकवींच्या ‘औदुंबर’ कवितेतील निसर्गचित्रणावर यावेळी अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले. एखाद्या कुशल चित्रकाराने काही कुंचल्याच्या फटकाऱ्यांत सुंदर चित्र साकारावे, त्याप्रमाणे बालकवींनी मोजक्या शब्दांत निसर्गाचे जिवंत चित्र उभे केले आहे. निळासावळा झरा, हिरवीगार शेतमळ्यांची गर्दी, पांढरी पायवाट आणि काळा डोह अशा विविध रंगछटांमधून त्यांच्या काव्यातील विलक्षण रंगदृष्टी जाणवते, असे साहित्यिकांनी नमूद केले.

कार्यक्रमात कलावंत, कवी आणि आयोजक तुषार वाघुळदे यांनी बालकवींच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये अनेक साहित्यिकांनी एकत्र येऊन भादली रेल्वे स्थानकावरील स्मारकाच्या ठिकाणी बालकवींचा अर्धाकृती पुतळा बसवावा, रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर निसर्गचित्रे साकारावीत, स्मारक परिसरात एलईडी प्रकाशव्यवस्था करावी तसेच ‘बालकवी निसर्ग उद्यान’ उभारावे, या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या मागण्यांसंदर्भात दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे, खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, अद्याप अपेक्षित पूर्तता न झाल्याने उपस्थित साहित्यिकांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

नवीन बांधण्यात आलेल्या स्मारकाच्या काही फरशा निघाल्या असून बालकवींची प्रतिमाही अद्याप लावण्यात आलेली नसल्याची बाब यावेळी उपस्थित करण्यात आली. त्यामुळे बालकवींच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकाची योग्य देखभाल आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. स्टेशन मास्तर हुकूमसिंग पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगत लवकरच आवश्यक पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पत्रकार प्रसाद जोशी यांनी बालकवींच्या साहित्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. बालकवींच्या स्मृतीला उजाळा देणारे उपक्रम सातत्याने आयोजित केल्यास त्यांच्या साहित्याचा अमूल्य ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बालकवींच्या काही कविता गेय स्वरूपाच्या असल्याने त्यांचा अल्बम समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

कार्यक्रमात बालकवींच्या निसर्गकवितांचा साहित्यिक वारसा आणि त्यांच्या योगदानावर अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली. त्यानंतर रंगलेल्या कवी संमेलनात विविध कवींनी आपल्या स्वरचित निसर्ग, सामाजिक आणि समकालीन आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. निसर्ग संवर्धन आणि समकालीन साहित्य या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, पत्रकार प्रसाद जोशी तसेच रसिक-श्रोत्यांनी सहभाग घेत विचार मांडले.

काव्य मैफिलीत ॲड. राधिका ढाके, अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, शीतल पाटील, सुधीर चौधरी, मयूर पाटील आदी कवींनी सहभाग घेतला. काव्यवाचन, चर्चासत्र आणि साहित्यिक संवादामुळे संपूर्ण वातावरण साहित्यरसाने भारून गेले होते.

कार्यक्रमाचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे सांगता झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेली ‘डबा पार्टी’. सर्व कवी आणि साहित्यिकांनी सोबत आणलेले जेवणाचे डबे एकत्र उघडून सहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे साहित्यिक सोहळ्याला कौटुंबिक आणि आपुलकीची जोड मिळाली. कवी-साहित्यिकांमधील स्नेहभाव अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे, हभप गोपाळ ढाके, लेखक ए. के. नारखेडे, चीफ टी.एम.सी. जयश्री तायडे, टी.आय. नवीन कुमार, वीरेंद्र जयस्वाल, उपप्रबंधक कुणाल शेगोकार, नितीन नाईक आणि भादलीच्या पोलीस पाटील ॲड. राधिका ढाके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. राधिका ढाके यांनी आभार मानले.

बालकवींच्या जयंतीनिमित्त आयोजित या काव्य मैफिलीने त्यांच्या निसर्गकवितांचा वारसा पुन्हा एकदा रसिकांसमोर जिवंत केला. मात्र, बालकवींच्या स्मारकाची प्रलंबित कामे पूर्ण करून त्यांचा साहित्यिक वारसा अधिक प्रभावीपणे जपण्याची मागणीही या सोहळ्यातून पुढे आली.


Protected Content

Play sound